लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न- केंद्रीय गृहमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका सार्वजनिक सभेला संबोधित करतांना बोलत होते. केंद्र सरकार नक्षलग्रस्त विभागांना या समस्येतून मुक्त करण्याच्या अगदी जवळ आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका बाजूला नक्षलग्रस्त विभागात रस्ते आणि शाळा उभारल्या जात आहेत तर दुसरीकडे नक्षल्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा कठोरपणे सामना केला जात आहे. २००९ च्या तुलनेत या नक्षली हिंसेच्या घटना केवळ एक चतुर्थांशच राहिल्या असल्याचंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गरीबांना घर, गॅस, वीज जोडणी आणि नळाची जोडणी देत आहे त्याचबरोबर मोफत उपचारही देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.