पिंपरी : केंद्र सरकारने "शिक्षणाचा मूलभूत अधिकार" या कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळेत आरक्षण गटातील व अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांसाठी सर्व प्राथमिक शाळेत जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. अनेक पालकांना विशेषता झोपडट्टीवासीयांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येतात. यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. समाजातील उपेक्षित घटकांची ही अडचण दूर व्हावी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने हेल्प लाईन नंबर (7218851885) जाहीर करण्यात आला आहे.

या हेल्पलाईन द्वारे गरजू पालकांना योग्य मार्गदर्शन केले जाईल तसेच प्रवेश प्रक्रियेशी संबंधित महत्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रक्रियेची माहिती देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी प्रसिद्धीस दिली आहे. इच्छुक पालकांनी हेल्पलाईन नंबरवर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.