सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्ती पत्र वितरित केली. त्यानंतर नव्यानं नियुक्ती झालेल्या काही जणांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध केल्याबद्दल नव्यानं भरती झालेल्यांनी केंद्रसरकार्सचं अभिनंदन केलं आणि आपली कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याची श्रेणी सुधारण्यासाठीच्या कर्मयोगी प्रारंभ मोड्यूलचं महत्व अधोरेखित केलं. 

प्रधानमंत्र्यांनी यापूर्वी गेल्या वर्षीच्या नोव्हेम्बर महिन्यात नव्यानं नियुक्त झालेल्या ७१ हजार जणांना, तर ऑक्टोबर महिन्यात ७५ हजार जणांना नियुक्तीपत्र वितरित केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकार देशातल्या युवा वर्गासाठी  रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं गृह राज्यमंत्री अजय कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित रोजगार मेळ्यात बोलत होते. देशात १० लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रसरकारने अनेक कार्यक्रम आणि उपक्रम सुरु केल्याचं ते यावेळी म्हणाले. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज मुंबईत वांद्रे इथं आयोजित रोजगार मेळ्यात विविध पदांवर भरती झालेल्या २५ तरुणांना नियुक्ती पत्र वितरित केली. रंगशारदा इथं आयोजित रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११७ उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरित केली जाणार असून, केंद्रसरकारच्या विविध १० विभागांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.