बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वादात लक्ष घालत भारतीय ऑलिंपिक संघटनेनं मोठा निर्णय घेतला असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये खेळाडू मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव यांच्यासह आणखी दोन वकिलांचा समावेश आहे.

या समितीनं एक महिन्यात आपला चौकशी अहवाल सादर करायचा असून समितीकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना पदावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी भारतीय कुस्तीपटूंनी या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. काल केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खेळाडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.