प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतही विविध योजनांचं लोकार्पण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात संध्याकाळी प्रधानमंत्र्यांची सभा होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं शहरभर प्रधानमंत्र्यांच्या स्वागताचे भव्य होर्डिंग लावले आहेत.

वांद्रे - कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर मेट्रो मार्गिका २- अ आणि ७ च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करतील. बृहन्मुंबई महापालिकेच्या २० ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, मुंबईतल्या सुमारे ४०० किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन असे विविध कार्यक्रम यावेळी होतील.

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड - मुंबई १ चं लोकार्पणही केलं जाणार आहे. या एकाच कार्डवरुन मेट्रो, रेल्वे आणि बेस्टच्या बस चं तिकीट काढणं भविष्यात शक्य होणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त फेरीवाल्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे. यानंतर प्रधानमंत्री नव्या मेट्रो मार्गिकेनं प्रवासही करतील.