स्वस्त, दर्जेदार औषध उत्पादनांकरता संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्नांची गरज - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगली ख्याती प्राप्‍त झालेली आहे. त्‍यामुळे स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनं तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हे झालं तर आपल्या फार्मा उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्‍तार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

फार्मा उद्योगात रोजगार निर्मितीची क्षमता आहे आणि सामाजिक आर्थिक परिवर्तन देखील घडवून आणण्याची क्षमता आहे. विविध क्षेत्रातल्या अधिकाधिक लोकांना फार्मा क्षेत्राशी जोडण्यासाठी कृषी आधारित उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. उद्योगांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी देशात उपलब्ध होत असलेल्या प्रगत दळणवळण सुविधांचा वापर करण्यावरही गडकरी यांनी भर दिला. नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे आणि याठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. औषध उद्योगांनी नागपुरात आपलं क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असं आवाहन त्यांनी  फार्मा कंपन्यांना केलं.

औषध महानियंत्रक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. वेणुगोपाल सोमाणी यावेळी उपस्थित होते. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून औषधं सर्वांना परवडणारी बनवण्याच्या संधी शोधता येतील. फार्मा उद्योगानं प्रॉडक्ट बेस मॉडेलपासून सर्व्हिस बेस्ड मॉडेलवर काम करण्याची गरज आहे, असंही डॉ. सोमाणी यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी, ७२ व्या आयपीसीच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्‍यात आलं. तसंच, गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मंडळींना पुरस्कार प्रदान करण्‍यात आले. 

नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे आणि याठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. औषध उद्योगांनी नागपुरात आपलं क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असं आवाहन केंद्रीय नितीन गडकरी यांनी  फार्मा कंपन्यांना केलं.