आगामी काळात अग्नीवर सशस्त्र दलात महत्वाची भूमिका बजावतील - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपर्क रहित युद्धाच्या नव्या आघाड्या आणि सायबर युद्धाचं आव्हान, या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत सैनिक भारतीय सशस्त्र दलासाठी महत्वाचे ठरणार असून, आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता असल्यामुळे आगामी काळात अग्नीवर सशस्त्र दलात महत्वाची भूमिका बजावतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तिन्ही सेना दलांमधल्या अग्निविरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते.

नवा भारत हा नव्या जोमाने भरला असून, सशस्त्र दलाचं आधुनिकीकरण आणि त्याला आत्मनिर्भर बनवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं ते यावेळी म्हणाले. अग्निपथ या पथदर्शी योजनेचे प्रणेते ठरल्याबद्दल त्यांनी अग्नीवीरांची प्रशंसा केली आणि हे परिवर्तनशील धोरण भारतीय सशस्त्र दलाला मजबूत करण्यामध्ये आणि भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना सज्ज करण्यामध्ये गेम चेंजर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.