येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा होती म्हणून या प्रकल्पांचं उद्घाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याचं ते म्हणाले.  

मुंबईतलं मेट्रोचं जाळं पूर्ण होईल तेव्हा ३०-४० लाख नागरिकांना त्याचा लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज २० हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचं उद्घाटन झालं. आणखी १२३ दवाखाने मार्चपर्यंत सुरू होतील, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. लवकरच होणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही विजयी होऊ आणि ट्रिपल इंजिन सरकार कार्यरत होईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामानं उत्तर देऊ असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळू नये, असा आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिला होता असा आरोप त्यांनी केला. पण सध्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नामुळं आज सुमारे १ लाख १५ हजार फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईतल्या रस्त्यांचं क्राँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. आता या रस्त्यावर ४० वर्ष खड्डे पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. लवकरच धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना बोलवू, असं ते म्हणाले.

सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटा घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, कपिल पाटील, रामदास आठवले यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातले मंत्री आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.