माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, रतन टाटा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 25 व्या SIES श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इतर विजेत्यांमध्ये पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. मार्तंडा वर्मा शंकरन वलियाथन यांचा समावेश आहे, वालियाथन यांनी  कमी किमतीचं प्रोस्थेटिक हार्ट व्हॉल्व्ह विकसित केलं आहे, जे जगातील कमी किमतीच्या बायो-मेडिकल इनोव्हेशनच्या उत्कृष्ट तुकड्यांपैकी एक आहे.

आरिफ मोहम्मद खान यांना जननेते म्हणून  प्रोफेसर अजय के सूद यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात  आणि विशाका हरी यांना अध्यात्मिक नेतृत्वासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक नेतृत्व, समुदाय नेतृत्व, विज्ञान- तंत्रज्ञान आणि सामाजिक विचारवंत या चारही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. यावेळी बोलतांना माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की भारतीय सभ्यता आजही भरभराटीला येत आहे कारण आमचा वसुधैव कुटुंबकम वर विश्वास आहे.

आमचा वसाहतवादी शासनावर विश्वास नाही पण आम्ही वसाहतवादी मानसिकतेत जगत आहोत. जितक्या लवकर आपण वसाहतवादी मानसिकता सोडून देऊ तितके चांगले आपण महान लोकांच्या शिकवणी आणि उपदेशाने प्रेरित होऊन जगु शकु असंही त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, मानव सेवा, माधव सेवा व गरिबांची सेवा करणं हे देवाची सेवा करण्यासारखे आहे. हे आपल्या धर्म आणि संस्कृतीचे सार आहे. जगभरातील लोक भारताकडे पाहत आहेत.. जगभरात भारताची ओळख आहे. जर आपण आपली परंपरा आचरणात आणली तर भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असंही ते म्हणाले.