दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : दिशा सलीयान मृत्यू प्रकरणी एसआयटी, अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा उपुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. आज या प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सभागहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.

भाजपा आमदार नितेश राणे पुढं आले आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. दिशा सालियानचा उत्तर तपासणी अहवाल जाहिर करण्याची मागणी भाजपाचे अमित साटम यांनी केली. तर याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी माधुरी मिसाळ यांनी केली.

गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा १० मिनिटांसाठी, नंतर २० मिनिटांसाठी त्यानंतर २ वेळा १५ मिनिटांसाठी, तर पाचव्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. त्यानंतर फडनवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते एसआयटीला सादर करावेत असं त्यांनी सांगितलं.