जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार असल्यानं राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची संधी - मुख्यमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळालं ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  कालपासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ भारताकडे राहणार आहे. याकालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून त्यापैकी १४ बैठका राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये होणार आहेत. या परिषदेच्या आखणी आणि नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. या बैठकीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.