महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा - अमित शाह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. सीमावादावर काल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलं. दोन्ही राज्यातल्या तीन मंत्र्यांची समिती स्थापन करुन सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशा शहा यांच्या सुचनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत अंमलबजावणी करणार असल्याचं बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.

सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात संवेदनशीलपणे लक्ष घातल्याबद्दल त्यांनी अमित शाह यांचे आभार मानले. सीमावाद घटनेच्या चोकटीत राहून सोडवावा, असंही शाह यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर अंतिम निकाल येत नाही, तो पर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांविरोधात कोणतेही आरोप प्रत्यारोप करू नये, अशा सुचना देखील शाह यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना केल्या. या प्रकरणातल्या खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर पसरवणाऱ्यां विरोधात योग्य ती कारवाई करण्याचा ईशारा शाह यांनी दिला.

तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती नेमण्याचाही सुचना त्यांनी केल्या.