सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यातल्या भिडे वाड्यात करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. छगन भुजबळ यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. नागपूर सुधार प्रन्यास नं गेल्या सरकारच्या काळात भाडे पट्ट्यावर दिलेल्या भूखंडाची किंमत ८३ कोटी रुपयाहून जास्त असुन त्यात तत्कालीन नगर विकास मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावरुन आज विधानपरिषदेत गोंधळ झाला.

विरोधकांनी केलेल्या आरोपावर सत्ताधारी पक्षानं हरकत घेतली. यावर झालेल्या गोंधळानं सभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकुब केलं.सभागृह नेते देवेद्र फडनवीस उत्तर द्यायला उभे राहिल्यावर देखील  विरोधकांनी धोषणा देत गोंधळ सुरूच ठेवला. यावेळी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र अशा पद्धतीनं कोणी दबाव आणू शकतो नाही सांगत फडनवीस यांनी ती फेटाळून लावली. हा भूखंडाचा विषय नसून गुंठेवारीचा आहे, विरोधकांना चुकीची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र घोषणा चालूच राहिल्यानं कामकाज पुन्हा दुसऱ्यांदा तहकुब झालं.