जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारताच्या तिरंग्यावरून हे बोधचिन्ह तयार करण्यात आलं आहे.

वसुधैव कुटुंबकम् असा भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा मुख्य विषय आहे. मानव, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव या सर्व जीवसृष्टीचं महत्त्व आणि पृथ्वी, तसंच व्यापक विश्वात त्यांचं परस्परावलंबित्व अधोरेखित करणं हे या विषयाचं ध्येय आहे. या कार्यकाळात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ३२ विविध क्षेत्रांशी संबंधित २०० पेक्षा जास्त बैठका होणार आहेत.

भारत आजपासून जी ट्वेंटी समूहाचं अध्यक्षपद भूषवत आहे, त्यानिमीत्त देशभरातल्या शंभर स्मारक स्थळांवर आजपासून येत्या ७ तारखेपर्यंत रोषणाई तसंच विविध कार्यकमांचं आयोजन केलं जात आहे. त्यात राज्यातल्या ७ ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईत घारापुरी इथल्या एलिफंटा केव्ज, पुण्यात आगा खान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला, औरंगाबादमध्ये वेरुळची लेणी आणि दौलताबाद किल्ला तसंच नागपूरमध्ये उच्च न्यायालयच्या जुन्या ईमारतीचा त्यात समावेश आहे. जी 20 शिखर समुह परिषदेचं पुढच्या वर्षीचं अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. भारत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे.