पुणे : जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर, समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्री. खराडे म्हणाले, तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या तबांखूमुक्त शाळा उपक्रमाला गती द्यावी. पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एकाच दिवशी संयुक्त कारवाई मोहिम राबवावी. एकूणच राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे श्री. खराडे म्हणाले.
डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात तबांखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेर ५४ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून ४ हजार ३०८ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २६ तंबाखू नियंत्रण कक्षांमार्फत ५ हजार ३८६ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने ७६ नागरिकांवर कारवाई करुन ३ हजार ७६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून ५३० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ६ नागरिकांवर कारवाई करुन ७०० हजार रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
नोव्हेंबर अखेर सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त ग्रामीण आणि शहर पोलिसांनी २०२२-२३ मध्ये नोव्हेंबर अखेर अन्न व औषध अधिनियमाखाली २ कोटी ७५ लाख ५७ हजार २०९ रकमेचा गुटखा आणि कोटपा कायद्याअंतर्गत ११ लाख ८० हजार ६७५ रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने २७ प्रकरणात कारवाई करुन १ कोटी ६ लाख ३१ हजार ८५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.