राज्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज याची घोषणा केली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ नोव्हेंबरला  अधिसूचना जारी होईल. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता  येतील. अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  ७ डिसेंबर आहे.  दिनांक १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. निवडणूक क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.