नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला शहर श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्रदान

 


मुंबई (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट इंडियाच्यावतीनं कोची इथं झालेल्या १५ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला,‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहर श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. यासाठी २० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली इथं या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. या सादरीकरणानंतर ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत कोचीच्या बोलगट्टी इथं झालेल्या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री  कौशल किशोर यांच्या हस्ते  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला हा पुरस्कार देण्यात आला. एनएमएमटीचे परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दर वर्षी शहरे, मेट्रो कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित, शहरी वाहतूक आणि सर्वोत्तम प्रकल्पांच्या विविध १२ श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार सर्व राज्ये, मेट्रो, रेल्वे, वाहतूक उपक्रम इत्यादींकडून विहित नमुन्यात पुरस्कार प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला हे नामांकन मिळाले होते.