सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज कराड इथं, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

यशवंतराव चव्हाण यांची नाळ शेतकरी आणि कष्टकऱ्यांबरोबर जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करत आहे, असं ते म्हणाले. पारंपरिक शेतीला अत्याधुनिक शेतीची जोड देत शेतकरी सेंद्रीय शेतीकडेही वळत आहेत. या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. एन.डी.आर.एफ. च्या निकषात बदल करुन शेतकऱ्यांना ४ हजार ७५० कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप केलं, तसंच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजाराची मदतही दिली, असं त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यात विविध पिकांचं संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी १० कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी दिली. कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे  हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कराड इथल्या ५ मजली नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  झालं. कराड इथं छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, आदी उपस्थित होते.