धर्म, जात आणि भाषेच्या आधारे देशात फूट पाडू पाहणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला धर्म, जात आणि भाषेत विभाजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमधील केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं राष्ट्रीय एकता दिवस संचलन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय एकता दिवस ही आपल्या देशाला एकत्र आणण्यात सरदार पटेलांच्या अमूल्य भूमिकेला श्रद्धांजली आहे.

सरदार पटेल यांच्या संकल्पनेनुसार सर्व नागरिकांना समान संधी देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे केंद्र सरकारच्या सर्व धोरणांचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.

एकता दिवस परेडमध्ये बीएसएफ आणि पाच राज्य पोलीस दलांच्या तुकड्यांचा सहभाग होता. तुकड्यांव्यतिरिक्त, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मधले सहा पोलीस क्रीडा पदक विजेतेदेखील या परेडमध्ये सहभागी झाले होते. मोरबी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.