जलसंवर्धन क्षेत्रातल्या २० वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धन क्षेत्रात गेली २० वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बनासकांठा जिल्ह्यातल्या थराड इथं ८ हजार कोटी रुपयांच्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर झालेल्या जनसभेला संबोधित करत होते. या भागातल्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा उत्तर गुजरातच्या ६ जिल्ह्यांमधल्या एक हजार गावांमधल्या जलसिंचनाला फायदा होईल असंही त्यांनी सांगितलं.   

गेल्या वीस वर्षात सरकारनं पावसाच्या पाण्याच्या पुर्नवापरावर त्याचप्रमाणे हे पावसाचं पाणी समुद्रात वाहून जाणे रोखण्यासाठी धरणांच्या बांधण्यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं. सरकारच्या सुजलाम सुफलाम योजनेमुळे शेती बरोबरचं दुग्धव्यवसाय आणि गावाच्या आर्थिक प्रगतीवरही सकारात्मक परिणाम झाल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक बाजारपेठेत खतांच्या किंमतीत वाढ होऊनही सरकार ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार शेतकऱ्यांना शीतगृह, अन्नप्रक्रिया याबाबतही मदत करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

बनासकांठा जिल्ह्यातल्या ४ लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन केल्याबद्दल त्यांनी जिल्हावासीयांंचं अभिनंदन केलं. यावेळी गुजरातचे जलसिंचन मंत्री ऋषिकेष पटेल ही उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी आज पायाभरणी केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये कसारा ते धंतीवाडा नर्मदा कालवा पाईपलाईन या १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांनी दोन रेल्वे प्रकल्पांचं लोकापर्णही केलं.