उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीसाठी जपानच्या भूमीवरुन मारा केल्याबद्दल, जपानकडून कडक शब्दांत निषेध

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने गेल्या पाच वर्षात आज प्रथमच जपानच्या दिशेने मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं. अचानक झालेल्या या चाचणीमुळे जपानमधे ताताडीने स्थलांतराच्या हालचाली कराव्या लागल्या तसंच रेल्वेगाड्या थांबवाव्या लागल्या. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र चाचणीचा कार्यक्रम गेले १० दिवस सुरु असून त्यातली ही क्षेपणास्त्र डागण्याची पाचवी वेळ होती. त्यातलं किमान एक क्षेपणास्त्र जपानच्या भूमी वरुन पुढे पॅसिफिक महासागरात कोसळल्याचा दावा जपानने केला आहे. या माऱ्यात जपानची मोठी हानी झाल्याचं वृत्त नाही. परंतु ही चाचणी अतिशय बेपर्वाईने केली असल्याचं सांगून जपानने त्याबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियानेही या चाचणीचा कडक शब्दात निषेध केला असून त्याला उत्तर देण्यासाठी लष्करी पातळीवर आपसात चर्चा सुरु केली आहे. दक्षिण कोरिया आणि जपानच्या म्हणण्यानुसार हे क्षेपणास्त्र ९७० ते हजार किलोमीटर्स उंचीवरुन सुमारे साडेचार हजार किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन समुद्रात पडलं.