लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार केली होती त्यावर उत्तर देताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, ‘एन वॉर्ड’ चे सहायक आयुक्त संजय सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर, यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, गुजरात शासनाने लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ ही रुग्णवाहिका योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसर येथे ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार आहे. जिल्ह्यातील समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येइल. ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांकानुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री.लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

‘आर साऊथ वॉर्ड’ येथे उद्या पालकमंत्री आपल्या भेटीला

दि.6 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त  नागरिकांनी, आपल्या तक्रारीच्या अर्जासह ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

शुक्रवार दि.07/10/2022 रोजी आर साऊथ वॉर्ड येथे, शनिवार 08/10/2022 रोजी के ईस्ट वॉर्ड, सोमवार दि.10/10/2022  रोजी आर सेंट्रल वॉर्ड, बुधवार दि. 12/10/2022 रोजी एल वॉर्ड, गुरुवार दि. 13/10/2022 रोजी एस वॉर्ड, शुक्रवार दि.14/10/2022 रोजी एम ईस्ट वॉर्ड, शनिवार  दि.15/10/2022 एच वेस्ट वॉर्ड, सोमवार दि.17/10/2022 रोजी आर नॉर्थ वॉर्ड, बुधवार,दि 19/10/2022 रोजी पी नॉर्थ वॉर्ड, गुरुवार दि 20/10/2022 रोजी पी साऊथ वॉर्ड, सोमवार येथे 31/10/2022 रोजी एम वेस्ट वॉर्ड, बुधवार दि.02/11/2022 रोजी के वेस्ट वॉर्ड, गुरुवार दि. 03/11/2022 रोजी एच ईस्ट वॉर्ड तर शुक्रवार, दि.4/11/2022 रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित रोजी सकाळी 10 वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम  सुरु होईल.

जिल्हाधिकारी: https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : https://portal.mcgm.gov.in/ वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.