बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष, कंपनीची चौकशी करण्याचे आदेश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले गेल्याचे निदर्शनाला येत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. अपघातानंतर त्यांनी या कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे आदेश दिले आहेत. या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची आज प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी  केली. त्यात एसी स्लीपर कोच बसेस प्रवास योग्य आहेत का, बसची आंतर्बाह्य उंची, लांबी, रुंदी, मधल्या मार्गिका, आपत्कालीन दरवाजे आणि काचा फोडण्यासाठीचा सुरक्षा हातोडा,  जीपीएस यंत्रणा, स्पीड गव्हर्नर आदी बाबी तपासल्या गेल्या. त्याचबरोबर  बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे बसवण्यात आले याचीही माहिती घेतली गेली.