सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून पी एफ आय वर निर्बंध

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्य तसच केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याविरोधात बेकायदेशीर व्यवहार प्रतिबंधक कायदा अर्थात यु ए पी ए लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. पी एफ आय चे जगभरात अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत आणि पी एफ आय चे काही कार्यकर्ते आयसिस मध्ये सामील होऊन इराक, अफगाणिस्तान आणि सीरिया मध्ये आतंकवादी कारवाया करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. आतापर्यंत गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाच्या राज्य सरकारांनी पी एफ आय वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या पत्रकात दिली आहे. या निर्णयाचं देशभरातल्या मुस्लिम संघटनांनी स्वागत केलं आहे.या कारवाईची खूपच गरज असल्याचं ऑल इंडिया सुफी सज्जादनशीन कौन्सिलचे अध्यक्ष सय्यद नासिरुद्दीन चिस्ती यांनी म्हटलं आहे. पी एफ आय देशातल्या मुसलमान युवकांना धर्माच्या नावाखाली भडकावण्याचं काम करत होती, त्यामुळे या कारवाईचं आम्ही स्वागत करतो, असं तंझीम उलेमा ए इस्लाम या संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अश्फाक उल काद्री यांनी म्हटलं आहे. पी एफ आय मुस्लिम युवकांची दिशाभूल करत असल्याचं सांगत या संघटनेला देणग्या कुठून मिळत आहेत याची चौकशी करण्याची मागणी सुफी इस्लामिक बोर्डाने केली आहे.