राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विट संदेशात राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू म्हणाल्या की कठोर परिश्रम आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात झोकून देऊन सातत्यानं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा. तिबेटचे अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी प्रधानमंत्र्यांना पत्राद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जीवन, सेवा आणि समर्पणाचं प्रतीक आहे.  मोदींनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोट्यवधी जनतेला त्यांचे हक्क देऊन आशा आणि विश्वासाची भावना निर्माण केली आहे. प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे 'नवा भारत' जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे. मोदींनी जागतिक नेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाला नवा आयाम दिला असून गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिलं आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

प्रधानमंत्र्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. देशवासीही नव्या आत्मविश्वासानं हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दमदार नेतृत्वानं जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत केली आहे. मोदी हे 'एक भारत श्रेष्ठ भारत',या संकल्पनेचे शिल्पकार आहेत, असं ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.