प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. 

एप्रिल २०२० पासून सुरु असलेल्या या योजनेद्वारे देशभरातल्या ८० कोटी जनतेला मोफत धान्य मिळतं. आतापर्यंत या योजनेवर ३ लाख ४५ हजार कोटी रुपये खर्च झाला, तर डिसेंबरपर्यंत या योजनेवर वाढीव ४४ हजार ७६२ कोटी रुपये खर्च येईल.

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठीच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ मंजूर केली. यामुळे सरकारी तिजोरीवर एकूण १२ हजार ८५२ रुपयांचा भार पडेल, असं ठाकूर यांनी सांगितलं. 

नवी दिल्ली, अहमदाबाद, आणि मुंबईतल्या छत्रपति शिवाजी महाराज स्थानक या तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. देशातल्या १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनि वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे ३५ हजार ७४४ नवे रोजगार निर्माण होतील असही ते म्हणाले.