भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार आहे. दर रविवारी रात्री ९ ते १० दरम्यान ७५ भागांच्या या मालिकेचं प्रसारण होईल अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाच्या उप महासंचालिका स्मिता वत्स शर्मा यांनी मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठीसह एकूण ९ भाषांमध्ये या मालिकेचं प्रसारण २० ऑगस्टपासून रात्री ८ ते ९ यावेळेत होणार आहे. 

वास्को द गामाचे भारतात आगमन झाल्याच्या कालखंडापासून स्वातंत्र्य पर्यंतचा कालावधी यात माहितीपट आणि नाट्य रूपांतर पद्धतीने दाखवला जाणार आहे. विविध इतिहास तज्ज्ञ आणि मान्यवरांच्या मदतीने या मालिकेसाठी संशोधन करण्यात आलं आहे. यासाठी दूरदर्शनने एक समिती नेमली होती अशी माहिती निर्मिती प्रमुख राहुल पराशर यांनी दिली. ४ के HD दर्जामध्ये तयार करण्यात आली आहे. ही मालिका नव्या भारताचे आणि नव्या दूरदर्शनचे रूप घेऊन आल्याची माहिती मालिकेतले सूत्रधार अभिनेते मनोज जोशी यांनी दिली. 

स्वराजसोबतच 'जय भारती', ' कॉर्पोरेट सरपंच' आणि 'ये दिल मांगे मोअर' या मालिकाही दूरदर्शनवर १५ ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. नव्यानं सुरू होणारा “सूरों का एकलव्य" हा रियालिटी म्युझिक शो १४ ऑगस्टपासून शनिवार आणि रविवारी रात्री ८ ते ९ या प्राईम टाईममध्ये प्रसारित होईल. 'स्टार्ट अप चॅम्पियन्स २.०' या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ४६ स्टार्टअप्स प्रवास आणि त्यांचे यश डीडी न्यूजवर शनिवारी रात्री ९ वाजता आणि डीडी नॅशनलवर रविवारी दुपारी १२ वाजता पाहता येईल.