मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क राज्याच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार असून, या पार्कच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तसंच वाहतूक खर्चामध्ये बचत होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. सध्याच्या वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत असून भारतात हा खर्च १६ टक्क्यापर्यंत आहे. या खर्चात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून  ६ ते ७ टक्के बचत होऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं. 

रत्नागिरी, जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं. या माध्यमातून उद्योग व्यवसायाला चालना मिळेल, वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किंमती कमी होण्यात मदत होईल, याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांनाही होईल, असं ते म्हणाले. कोकणाच्या विकासाकरता, तसंच बंदरांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली असता, याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठवायला त्यांनी सांगितलं असून, निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम लवकरच सुरू होईल, असं याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.