जन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन

 

मुंबई : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेतस्थळांची नक्कल करुन CRSORGIGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATONLINE.COM अशा काही फसव्या, बनावट संकेस्थळांच्या माध्यमातून समाजकंटकांद्वारे नोंदण्या केल्या जात आहेत. ही संकेतस्थळे अधिकृत मूळ संकेतस्थळांसारखीच आहेत. नागरिकांकडून जन्म – मृत्यू प्रमाणपत्रांसाठी रक्कम घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संकेस्थळांवर जन्म – मृत्यू घटनांची नोंदणी करु नये.

जन्म – मृत्यू नोंदणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरेाग्य संस्थेत घडली असेल तर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.