नवी दिल्लीत आज ‘स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ ही मालिकेचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची समरगाथे’मुळे लोकांना स्वातंत्र्याचं वास्तव चित्रं बघायला मिळेल.

प्रादेशिक भाषांचं संरक्षण स्वराज्यासाठी आवश्यक असून, दूरदर्शन आणि आकाशवाणीने देशाला संस्कारित करण्याचं काम कार्यक्रमांद्वारे केलं आहे. गृहमंत्री पुढं म्हणाले की, जगाला भगवदगीता, वेद, आणि झिरो संकल्पना देणारा देश अशिक्षित कसा असू शकेल, असा प्रश्नही शहा यांनी उपस्थितांना केला.

देशाच्या अभिव्यक्तीचं काम आकाशवाणी आणि दूरदर्शन करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, प्रसारभारतीचे सीईओ मयंक अग्रवाल उपस्थित होते.

ही मालिका १४ ऑगस्टपासून दूरदर्शनवर रात्री नऊ ते दहा या वेळेत प्रसारित करण्यात येणार असून, ७५ भागांच्या या मालिकेत स्वातंत्र्य चळवळीत ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचं चित्रण करण्यात आलं आहे.

आकाशवाणीवरूनही या मालिकेचं प्रसारण करण्यात येणार आहे. सत्यम शिवमं सुंदरम या संकल्पनेला प्रोत्साहन करण्याचं काम आम्ही करत आहोत, असंही  प्रसारभारतीचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी सांगितलं.