भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत - शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. सत्तेत आल्यावर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं, अद्यापी तीस टक्के लोकांना शौचालय मिळालेलं नाही, घरोघरी वीज देणार होते, पण केवळ सहासष्ट टक्के गरजुंकडेच वीज पोहोचली आहे, सगळ्यांसाठी घरं म्हणाले, आतापर्यंत तीस टक्के लोकांनाच मिळाली आहे.

घरोघरी पाणी देण्याच्या योजनेची मुदतही वाढवली आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा अद्याप मिळालेली नाही, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनी महिला सक्षमीकरण करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलले. त्याच दिवशी बिल्कीस बानो प्रकरणातल्या आरोपींना सोडलं. इडी आणि सीबीआयचा दुरुपयोग होतोय, बिगर भाजपा सरकारं पाडली जात आहेत, या सर्व प्रकारामुळे जनता नाराज असून, आम्ही येत्या दोन वर्षांत बिगर भाजपाशासित राज्यात जनमत तयार करण्याचं काम करू, असं पवार म्हणाले.