भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत आधुनिक बहुउद्देशीय सुविधा पार्कच्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेअंतर्गत देशभर आधुनिक मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क वेगानं विकसित करण्यासाठीच्या त्रिपक्षीय करारावर रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री वी. के. सिंह यांच्या उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या झाल्या. माल वाहतुकीचं केंद्रीकरण करणं आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लॉजिस्टिक गुंतवणूक स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या १४ टक्क्यावरून कमी करून १० टक्क्याच्या खाली आणणं हा यामागचा उद्देश आहे.

राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन मर्यादित, भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण आणि रेल्वे विकास मंडळ यांनी या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्या. या गती शक्ती मॉडेलच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती करायची आहे असं गडकरी यावेळी म्हणाले. मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क ही रेल्वे आणि रस्ते सुलभतेसह मालवाहतूक हाताळणी सुविधा असेल, ज्यामध्ये कंटेनर टर्मिनल, मालवाहू टर्मिनल, गोदामं, शीत गृह, यांत्रिकी सामग्री हाताळण्यासाठीची सुविधा आणि कस्टम क्लिअरन्स यासारख्या मूल्यवर्धित सेवांचा समावेश असेल.