स्वराज्य महोत्सवाअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. या उपक्रमांतर्गत आज राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवण्यात आला. आज सकाळी अकरा वाजता सर्व नागरिकांनी या उपक्रमात हिरिरीनं भाग घेत राष्ट्रगीताचं गायन केलं. मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्थानक आणि पोलिस ठाणे इथं आज सामूहिक राष्ट्रगीताचं गायन करण्यात आलं.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी, अधिकारी आणि कर्मचारी सामुहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले होते. मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वेस्थानकात सामूहिक राष्ट्रगीत गायनात पोलिस, जवान, मुंबईतील डबेवाले, प्रवासी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. तसंच काळाचौकी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं. राज्यात इतरत्रही ठिकठिकाणी नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हटलं.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट पंचायत समिती इथं  ७५ च्या आकारात मानवी साखळी करून राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व ११ तालुक्यात पंचायत समिती आणि सराव ग्रामपंचायती मध्ये या समूह राष्ट्रगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सर्व अंगणवाड्या, उमेद चे जवळ पास १५ हजार पेक्षा अधिक बचत गटातील महिला या मघ्ये सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर तालुक्यांतील भोसे येथे शिस्तबध्द रित्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ग्रामस्थांनी समूह राष्ट्रगीत गायन केले. रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, कोल्हापूर, भंडारा, सातारा, जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रगीत गायनाचा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.