हरिहरेश्वर किनाऱ्यावरील संशयित बोट प्रकरणाचा पोलीस आणि एटीएस कसून तपास करत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत निवेदन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर काल दुपारी एक संशयास्पद बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या बोटीची तपासणी झाली.

पोलिसांना या बोटीत 3 एके 47 रायफल्स, तसंच दारूगोळा आणि बोटीशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. ही बोट सापडल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला  आहे. जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी केली जात आहे. या घटनेचा कसून तपास स्थानिक पोलीस आणि राज्याचं एटीएस म्हणजेच दहशतवादविरोधी पथक एकत्रितपणे करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

या बोटीचं नाव लेडीहान आहे. हाना लॉंन्डरगन या ऑस्ट्रलियातील महिलेच्या मालकीच्या या बोटीचा कप्तान तिचा पती जेम्स हॉबर्ट हा आहे. ही बोट मस्कतहून युरोपकडे निघाली होती. ही बोट नादुरुस्त होती आणि समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटीचं टोईंग करता आलं नाही. यामुळे ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली, असं भारतीय तटरक्षक दलानं सांगितलं. भारतीय तटरक्षक दलाबरोबरच इतर संबंधित यंत्रणांशीही संपर्क साधल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.