पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं सुमारे ५० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं गेल्या ७-८ वर्षात सुमारे ५० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या कालावधीत इथेनॉलचं उत्पादन ४० कोटी लीटरवरुन ४०० कोटी लिटरपर्यंत वाढल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

हरियाणातल्या पानिपत इथल्या नव्या पद्धतीच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. त्यावेळी जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं. गेल्या ८ वर्षात देशातल्या घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर जोडणींची संख्या १४ कोटींवरुन ३१ कोटींपर्यंत वाढली आहे.

यामुळं देशातल्या जवळपास प्रत्येक घरात एलपीजी सिलेंडर पोहचल्याचं ते म्हणाले. या ३१ कोटींपैकी ९ कोटी उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. ८ वर्षांपूर्वी काही लाखांपमध्ये असलेली पाईप गॅस जोडण्यांची संख्या आता १ कोटींपर्यंत पोहोचली आहे. येत्या काही वर्षात देशातल्या ७५ टक्क्यांहून अधिक घरांपर्यंत पाइप गॅस पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. ८ वर्षांपूर्वी ८०० असलेल्या सीएनजी पंपांची संख्या संख्या आता साडे ४ हजारावर गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

 पानिपतमध्ये उभारण्यात आलेल्या इथेनॉल प्रकल्पामध्ये वर्षाला २ लाख टन भाताच्या तुसापासून ३ कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे. यामुळं वर्षाला ३ लाख टन कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन वाचणार आहे.