२०३० पर्यंत देशाची ऊर्जेची निम्मी गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०३० सालापर्यंत देशाच्या एकूण ऊर्जा उत्पादनापैकी ५० टक्के गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल, तर २०७० सालापर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल गांधीनगरमध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची भारतात ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

देशात विजेवरच्या वाहनांच्या वाढत्या मागणीसह या दिशेने एक मूक क्रांती घडत असून, केंद्र आणि राज्य सरकारांनी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि अनुदानात वाढ केल्याचं ते यावेळी म्हणाले. सुझुकीच्या अध्यक्षांबरोबर १३ वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या संभाषणाचा संदर्भ प्रधानमंत्र्यांनी दिला. कंपनीने गुजरातमध्ये संयंत्र बसवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना हा विश्वास होता, की गुजरातच्या विकासाप्रति असलेल्या कटिबध्दतेची कंपनीला उत्तरोत्तर प्रचिती येईल, असं ते म्हणाले.