विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळ्याचा उत्साह

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी आज अत्यंत उत्साहात महाराष्ट्रात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यावर निर्बंध आले होते. आज मात्र आपल्या विठू माउलीचं दर्शन घेताना मंदिराचा गाभारा वारकऱ्यांच्या आनंदानं आणि समाधानानं भरून गेला आहे. पहाटे प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मीणीची सपत्निक महापूजा केली. सध्या पाऊस सुरू असून राज्यातील बळीराजा सुखावला पाहिजे. कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टीची दुर्घटना घडू नये. राज्यात सर्व जाती धर्मातल्या लोकांसोबत बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे यावेळी घातलं. बीड जिल्ह्यातल्या देवराई तालुक्यातले रुई गावचे रहिवासी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जीजाबाई नवले या दाम्पत्याला महापूजेचा मान यंदा मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी नंतर या दाम्पत्यांचा सत्कार केला. मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासाचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. रिंगण या वारी विशेष अंकाचं प्रकाशन तसंच निर्मल वारी, हरित वारी या अभियानातल्या विजेत्या दिंड्यांना पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्र्यांनी केलं.

आषाढी वारीच्या निमित्तानं प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळत  पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपुरच्या सरकारी विश्रामगृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण जागृतीसाठी गेली बारा वर्ष 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' हा उपक्रम  राबवण्यात येतो. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाला अभिवादन करणारा संदेश ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत १२ ते १४ लाख भाविक रांगा लावून उभे आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छता गृह, आरोग्य केंद्र यांची सोय केली आहे. राज्यात इतरत्रही विठ्ठल मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरातही विठुरायाच्या पावलांवर डोकं ठेवण्यासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी भक्ती संगीताच्या कार्यक्रमांचं सांकेतिक दिव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त आज मुंबईत जुहू विलेपार्ले इथं आज वारकरी दिंडी  शिल्पांची पूजा करण्यात आली. संत नामदेव महाराज चौक इथल्या वाहतूक बेटावर ही शिल्प उभारली आहेत. यावेळी स्थानिक पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंढरपूरचं माहात्म्य, अनुभूती आणि तिथला अध्यात्मिक अनुभव अलौकिक आहे, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. श्रीविठ्ठलाप्रती असलेली आपली श्रद्धा अतूट असून आषाढी एकादशीला येणाऱ्या दिंडी आणि पालख्यांची परंपरा जगातील सर्वात प्राचीन आणि विशाल यात्रांपैकी एक गणली जाते, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे. वारकऱ्यांचा हा मेळा  आपल्या समृद्धपरंपरेचं प्रतिनिधित्व करतो तसंच सद्भाव आणि समानतेची शिकवण देतो, असं ते म्हणाले. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली इथंही सांकेतिक वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले होते.