जागतिक बँकेतर्फे भारतीय नागरिक इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेनं भारतीय नागरिक असलेल्या इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विकासक अर्थशास्त्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिल हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांच्या पश्चात काम करतील.

त्यांची नियुक्ती १ सप्टेंबर २०२२ पासून प्रभावी होईल. मिस्टर गिल सध्या समतुल्य वाढ, वित्त संस्थांचे उपाध्यक्ष असून, त्यांनी स्थूल अर्थशास्त्र, कर्ज, व्यापार, गरिबी आणि प्रशासन या विषयांवर काम केलं आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा करताना, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास म्हणाले, की गिल यांना नेतृत्व, बहुमूल्य कौशल्य आणि देशाच्या सरकारांसह समष्टि आर्थिक असंतुलन, वाढ, गरिबी, संस्था संघर्ष आणि हवामान बदल यांवर एकत्रित काम करण्याचा व्यावहारिक अनुभव आहे.

विकासाच्या अर्थशास्त्रातील बौद्धिक योगदानाबद्दल इंदरमित यांचा सर्वत्र आदर केला जातो, असं डेव्हिड मालपास यांनी सांगितलं. वर्ष २०१२ ते २०१६ या कालावधीत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ कौशिक बसू यांच्यानंतर मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करणारे गिल हे दुसरे भारतीय असतील.