लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून सरकार विरोधात घोषणा बाजी सुरु केली. त्या गोंधळात, अध्यक्षांनी सदस्यांना सार्वजनिक हिताचे काही मुद्दे मांडायची विनंती केली. वारंवार विनंती करूनही विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यावर अध्यक्षांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आणि लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. ताजं दूध आणि पाश्चराइझ्ड दुधाला GST अर्थात वस्तू आणि सेवा करातून पूर्णपणे वगळण्यात आल्याचं सरकारनं आज लोकसभेत  स्पष्ट केलं. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरामधून ही माहिती दिली. किमतीच्या लेबलसह  वेष्टनात नसलेलं दही, लस्सी, ताक आणि पनीर या  दुग्धजन्य पदार्थाना देखील जीएसटी मधून सूट देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लेबलसह वेष्टनामधलं  दही, लस्सी, ताक आणि पनीर हे पदार्थ आणि उच्च तापमानाच्या दुधासाठी  ५ टक्के इतका माफक जीएसटी लागू राहील, तर कंडेन्स्ड मिल्क, लोणी आणि चीझ या पदार्थांसाठी १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. जीएसटी मधील  सवलत सर्व राज्यांमध्ये एकसमान लागू राहील, असं त्या म्हणाल्या. जीएसटीचा दर जीएसटी परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार निर्धारित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय वारसा आणि त्याच्या संवर्धनाशी संबंधित उच्च शिक्षण देण्यासाठी आणि या क्षेत्रातल्या संशोधनासाठी लवकरच आय.आय.एच अर्थात भारतीय वारसा संस्थेची स्थापन होणार आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला ही माहिती दिली. उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये गौतमबुद्धनगर इथं ही संस्था स्थापन होणार असल्याचं ते म्हणाले. ही संस्था कलेचा इतिहास, संरक्षण, संग्रहालय विज्ञान, अभिलेखीय अभ्यास, पुरातत्त्व, प्रतिबंधात्मक संवर्धन यासारख्या विषयांमध्ये स्नातकोत्तर आणि संशोधन विषयक पदवी प्रदान करील असं ते म्हणाले.