देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, विविध राज्यपाल, मुख्यमंत्री, विविध देशांचे उच्चायुक्त, सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांनी सर्वांना संबोधित केलं. स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत आपल्याला ‘सबका प्रयास और सबका कर्तव्य’ या आधारे मार्गाक्रमण करायचं आहे. देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रवास सर्वांना एकत्रितरित्या करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशातले नागरिक, विशेषकरुन युवा आणि महिलांचं कल्याण हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, या शब्दात त्यांनी देशवासियांना आश्वस्त केलं. देशातले युवक केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसून देशाचं भविष्य घडवत आहेत. त्यासाठी राष्ट्रपती म्हणून मी कायम पाठिंबा देईन, असंही त्या म्हणाल्या. देश नव्या विचारांनी नव्या युगाचं स्वागत करण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रत्येक क्षेत्रात देश विकासाचं नवं पाऊल टाकतो आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या काळात देशानं केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. तसंच संथाल, पैका, कोल, भिल क्रांती, बिरसा मुंडा यांचा उल्लेख राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात केला. देशाच्या दूरवरच्या भागातली एक गरीब महिला देशाची राष्ट्रपती होत आहे, हेच भारतीय लोकशाहीचं सौंदर्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपतीपदावर पोहोचणं हे आपलं एकटीचं यश नसून भारतातल्या प्रत्येक गरिबाचं यश असल्याचं त्या म्हणाल्या. या पदासाठीचं आपलं नामांकन हे भारतातली गरीब जनता केवळ स्वप्न पाहूच शकत नाही, तर ती पूर्ण देखील करू शकते, याचा पुरावा असल्याचं त्या म्हणाल्या. शपथविधी पूर्वी सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. शपथविधी नंतर मुर्मू राष्ट्रपती भवनावर रवाना झाल्या. तिथं तिन्ही सेना दलांच्या वतीनं त्यांना सलामी देण्यात आली आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ झाला. 

स्वातंत्र्याच्या शतकीमहोत्सवापर्यंत ‘सबका प्रयास और सबका कर्तव्य’ या आधारे मार्गक्रमण करण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणं हा देशासाठी, विशेषतः देशातल्या  गरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी भावनिक क्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. द्रौपदी मुर्मू  भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याचं  संपूर्ण देशानं मोठ्या अभिमानानं पाहिलं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आशा आणि करुणेचा संदेश दिला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मुर्मू यांनी देशाच्या कामगिरीवर भर दिला असून, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन दिला आहे, मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या फलदायी कारकिर्दीसाठी शुभेच्छा,  असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

राष्ट्रपती प्रोफाइल

६४ व्या वर्षी राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. तसंच स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. १९९७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ओडिशातल्या रायरंगपूरमध्ये नगरसेविका म्हणून  निवडून आल्या. याच विधानसभा  मतदारसंघाचं त्यांनी २ वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. या काळात त्या ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य, परिवहन, पशुधन मंत्रीही होत्या. १८ मे २०१५ रोजी त्यांनी झारखंडच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. गेल्यावर्षी १२ जुलैपर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.