वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे इतर अधिकारी, तसेच केपीएमजीचे अभिषेक प्रसाद, नितिका मेहता, अमित भार्गव, फॉक्सकॉनचे वेक्टर चेन, एरिक लिन, पिव्ही लिन, वेदांताचे सतेश अम्बरडर, प्रणव कोमेरवार, ऍवनस्टारचे ग्लोबल एम.डी आकाश हेब्बर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हा उद्योग राज्यात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य देखील प्राप्त करुन घेण्यात येणार आहे. हा उद्योग राज्यात आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन राज्याच्या एकूण सकल उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यापूर्वी केवळ चार देशात असलेला हा उद्योग राज्यात यावा ही इच्छा आहे. हा उद्योग राज्यासाठी महत्वाचा आहे. उद्योग उभारणीसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या कालमर्यादेचे पालन व्हावे, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

वेदांता ग्रुपच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भातील माहिती श्री. अनबलगन यांनी दिली तर या राज्याच्या भूमिकेबाबत श्री. बलदेव सिंग यांनी सांगितले.

वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली असून या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी असणार आहे.