पोलिसांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिसांकरता राज्यात मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागीय पोलीस कार्यालयाचा तसंच पोलिसांसाठीच्या २०५ निवास स्थानांचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलिसांकरता सध्या ५० हजार घरांची गरज आहे, मात्र केवळ १९ हजार घरं उपलब्ध असून, त्यातही डागडुजी आणि देखभालीची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीनं शासन काम करत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व विभागांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. रस्त्यांचा विकास, नैसर्गिक आपत्ती, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वीज अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

सरकार रस्ते विकासावर विशेष लक्ष देणार असून रखडलेले विकासप्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचं ही ते म्हणाले. यासाठी कृषी विद्यापीठ सक्षम करण्यावर करण्यावर सरकार भर देणार आहे. 

मालेगाव जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत असून मालेगाव जिल्ह्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मालेगाव तालुक्यातील काष्ठी येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. 169 कोटी रुपये खर्च करून हे संकुल उभे करण्यात आले. यावेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते.

मालेगाव इथं जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, अन्याय होईल तिथं अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाविरुद्ध लढा ही बाळासाहेबांची शिकवण आम्ही विसरलो नाही.