नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी

 

मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.

नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकास मंत्री श्री. देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना तत्काळ नजिकच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर श्री. देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.