नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची रिपरिप आज सकाळपासून सुरु आहे. काही भागांत थोडा वेळ पाऊस, तर त्यानंतर पुन्हा काही काळ ऊन अअसा लपंडाव सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात कालपासून सर्वाधिक पाऊस माहूर ईथ ४० मिलीमीटर झाला आहे. तर किनवट ३६ मिलीमीटर, भोकर १३ मिलीमीटर, हिमायतनगर १२ मिलीमीटर, अर्धापूर ११ मिलीमीटर, आणि मुदखेडमधे ७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. लोहा, कंधार, मुखेड, देगलूर आणि नायगाव परिसरात आतापर्यंत चांगला पाऊस होत आहे. या भागात तूरळक प्रमाणात पेरणीला सुरूवात झाली आहे. अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली असून मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे. मशागतीची बहुतांश कामं ट्रॅक्टरनं उरकली जातात. मात्र आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारिक शेती अवजारांचा वापर केला जातो. ही अवजारं बनवण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे.