मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्याऐवजी आता आमदार अजय चौधरी गटनेते असतील, असं शिवसेनेच्या सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान, शिंदे यांचं मन वळवण्यासाठी शिवसेनेतर्फे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी आज सुरतमधे जाऊन त्यांची भेट घेतली. काही विद्यमान आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमधल्या सुरतमधे ला मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती आकाशवाणीच्या सुरत प्रतिनिधीनं दिली आहे. या संपर्कात नसलेल्या आमदारांमधे रायगडच्या तीन आमदारांचा समावेश आहे.
गुजरातमधले भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी या सगळ्यांची ला-मेरिडियनमधे जाऊन भेट घेतली. जळगाव जामोदचे भाजपाचे आमदार संजय कुटे याठिकाणी पोहोचले आहेत. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सुरतेतल्या सिव्हिल हॉस्पिटलमधे दाखल केलं आहे.
दरम्यान, या घडामोडींवर काँग्रेस प्रभारी एच के पाटील काँग्रेस आमदारांबरोबर आज बैठक घेणार आहेत, तसंच शक्य असेल तर महाविकास आघाडीचीही बैठक होईल, अशी माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आज रात्री शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची यासंदर्भात बैठक होणार आहे.
दरम्यान आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीनुसार सत्तेसाठी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही, आणि करणार नाही, असं शिंदे यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार पक्षाच्या संपर्कात असून, त्यांना परत येण्याची इच्छा आहे. शिंदे यांनी या आमदारांची दिशाभूल केली आहे, असं शिवसेनेतल्या सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आता उरलं नसून सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.