राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदनात सांगितलं.

केंद्र सरकारनं राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसहमतीनं निवडला जावा यासाठी कोणताही गंभीर प्रयत्न केला नाही असा आरोप कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी या निवेदनात केला. या महिन्याच्या २७ तारखेला सिन्हा आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, समाजवादी पार्टीचे नेते प्राध्यापक राम गोपाल यादव, तृणमूल काॅंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. सिन्हा यांनी तत्पूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षांच्या अधिक चांगल्या एकीकरणाचं राष्ट्रीय पातळीवरचं काम करण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं सिन्हा यांनी ट्विट संदेशाद्वारे स्पष्ट केलं.