खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्या बद्दल राज्याला आज तीसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते आज देण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिना निमित्त नवी दिल्ली इथं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला. राज्यानं 'इट राईट' या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यातल्या अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आलं आहे. यात बृहन्मुंबई, पुणे, मिरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक याचा समावेश आहे. खाद्य सुरक्षे संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. यात खाद्य परवाने, चाचणी सुविधा, प्रशिक्षण आणि ग्राहकाच्या हितासाठी केलेल्या कामांच्या आधारावर हे मानांकन अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण तर्फे दिलं जाते. राज्याने गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध आखणी करत उत्तम कामगिरी केली आहे. या यशा बद्दल अन्न आणि औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.