अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं - पाकिस्तान सरकारला भारताचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं, असा इशारा भारतानं पाकिस्तान सरकारला दिला आहे. पाकिस्तानातल्या पेशावर भागातल्या दोन शीख व्यापाऱ्यांची नुकतीच अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती.

अशा स्वरूपाची घटना प्रथमच झाली नसल्याचं  परराष्ट्र व्यवहार मंत्रलयाचे प्रवक्ते अरिन्दम बागची यांनी नवी दिल्ली इथे वार्ताहरांना सांगितलं. आपण त्या घटनेचे अहवाल पाहिले असून भारतातल्या सामान्य नागरिकांनी तसंच शीख समुदायानं या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असल्याचं ते म्हणाले.

पाकिस्तान सरकारनं या घटनेची प्रामाणिकपणे चौकशी करून दोषींना कडक शिक्षा केली पाहिजे, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे. पाकिस्तान सरकारनं देशातल्या अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी भारताची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.