राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गमवल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाची राजकीय हत्या राज्य सरकारनं केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. 

त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या संदर्भात  एका आठवड्यात अधिसूचना जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. हे आरक्षण ५० टक्क्याच्या वर नसावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. मध्यप्रदेश सरकारनं वेळीच ट्रीपल टेस्टसंदर्भात अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानं तिथलं ओबीसीचं आरक्षण टिकलं. पण महाराष्ट्रात सरकारच्या नाकर्तेपणा मुळे हे झालं नाही, अशी टीका फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलतांना केली. ओबीसीनां आरक्षण मिळावं यासाठी भाजप आंदोलन सुरुच ठेवेल, असही त्यांनी स्पष्ट केलं.