सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात ८१ कोटी ५७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१ कोटी ५७  लाख रुपयांचा अतिरिक्त निधी आज मंजूर करण्यात आला. तसंच एकूण २४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करायची कामं वेळेत पूर्ण व्हावीत तसंच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राखण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सुत्रानुसार देय ठरणाऱ्या नियत-व्ययाच्या व्यतिरिक्त आणखी १० कोटी रुपये इतका अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय “ राष्ट्रपिता महात्मा गांधी - एक अनुभूती” हा नवीन उपक्रम राबवायला देखील आजच्या  बैठकीत मान्यता देण्यात आली. या नवीन उपक्रमासाठी ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बैठकीत  सेवाग्राम विकास आराखडा-वर्धा या कॉफी टेबल बूकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं.